अपघात

चिखलीतील युवकाचा डोणगाव येथे भीषण अपघातात मृत्य

कासिद / चिखली – विशेष प्रतिनिधी : मेहकर-मालेगांव राष्ट्रीय महामार्गावर डोणगाव येथे आज रात्री ८:३० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या अपघातात चिखली येथील रहिवासी एक युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मृत युवकाची ओळख सतीश बाबुराव निकाळजे (खलसे प्लॉट, राऊतवाडी, चिखली) अशी झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृतक युवक आपल्या दुचाकी क्रमांक MH 26 AD 2586 वरून जात असताना हा अपघात घडला. टक्कर इतकी जोरदार होती की मृतकाचे चेहरा पूर्णपणे विकृत झाला होता. अपघाताची नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, परंतु प्राथमिक तपासात अतीवेग, निष्काळजीपणा किंवा समोरून येणाऱ्या वाहनाशी टक्कर यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस काँस्टेबल हर्ष सहगल, पवन गावणे आणि गोविंदा खंडागळे यांनी परिस्थिती नियंत्रणात घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह मेहकर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याचे समजते.
या अपघातामुळे काही वेळासाठी मेहकर-मालेगांव राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नंतर पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. “हा मार्ग नेहमीच धोकादायक ठरतो. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *