अपघात
चिखली-खामगाव-जालना महामार्गावर भीषण अपघात
पत्रकार राजेंद्र (राजू) सुरडकर यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

क़ासिद / चिखली : चिखली-खामगाव-जालना महामार्गावर मेरा खुर्द | व असोला दरम्यान आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात बेराळा तालुका चिखली येथील पत्रकार राजेंद्र (राजू) सुरडकर वय अंदाजे ३६ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे चिखली परिसरात तसेच पत्रकारितेच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरडकर हे स्विफ्ट डिझायर कारमधून अन्य तिघांसह प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेल्या कारचा अचानक ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघातात चार जण जखमी झाले, त्यापैकी राजेंद्र सुरडकर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित तिघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजेंद्र (राजू) सुरडकर हे चिखली परिसरात पत्रकारितेसोबतच वैद्यकीय क्षेत्रातील जाहिराती व विविध सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. वेगमर्यादा, वाहनाची स्थिती आणि चालकाचा ताबा सुटण्यामागील कारणे यांचा तपास केला जात आहे.



