Blog

चिखली पोलिसांचा अनोखा उपक्रम: ‘दारू नको, दूध प्या’

नववर्षाचे आगमन, मिशन परिवर्तन, नव्या पिढीला नवे आवाहन

क़ासिद / चिखली (रमीज़ राजा) :  नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने युवा पिढीमध्ये दारूच्या अतिसेवनाचे प्रमाण वाढत असुन याकडे लक्ष देत चिखली पोलीस स्टेशनने एक अनोखा आणि सकारात्मक उपक्रम राबविला. “दारू नको, दूध प्या” या संदेशासह शहरातील नागरिकांना दूध पाजून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. हा उपक्रम पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला असून, या उपक्रमाला चिखलीकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
               नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील जयस्तंभ चौक येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात चिखली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः हाताने दूधाचे ग्लास भरून रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः युवकांना दूध वाटप केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवा पिढीला दारूच्या व्यसनापासून दूर ठेवणे, तसेच आरोग्यदायी जीवनशैली आणि सुरक्षित नववर्ष साजरे करण्याचा संदेश देणे हा होता.
               पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी सांगितले की, “नववर्षाच्या स्वागतात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री आणि सेवन होते. यामुळे अपघात, मारहाणी आणि इतर गुन्हेगारी घटनांची शक्यता वाढते. युवकांना दारू ऐवजी दूध प्यायला प्रोत्साहन देऊन आम्ही एक सकारात्मक पर्याय दाखवू इच्छितो. दूध हे आरोग्यासाठी उत्तम आहे, तर दारू आरोग्य आणि समाजासाठी हानिकारक आहे. हा संदेश सर्वांनी मनापासून स्वीकारावा.”या कार्यक्रमाला चिखली शहरातील नागरिकांनी, विशेषतः युवा वर्गाने भरभरून साथ दिली. अनेकांनी उत्साहाने दूध पिऊन “दारू नको, दूध प्या” या ब्रिद वाक्याला प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केला.
               नववर्षाच्या संदर्भात मिशन परिवर्तन हा नव्या पिढीला नवे आवाहन देणारा ठरला आहे. पोलिसांच्या या सर्जनशील प्रयत्नामुळे शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारचे उपक्रम इतर ठिकाणीही राबवले जावेत, अशी आश नागरीकांनी व्यक्त केली. चिखली पोलीस स्टेशनच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून, “दारू नको, दूध प्या” हा संदेश यावर्षीच्या नववर्षात चिखलीकरांच्या मनात घर करून गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *