शेतकरी, कष्टकरी व भूमिहीनांच्या मागण्यांसाठी भूमी मुक्ती मोर्चा धडकला चिखली तहसील कार्यालयावर

चिखली (क़ासीद/मुख्तार शेख प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि भूमिहीनांच्या वाढत्या समस्यांवरून आज दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी भूमी मुक्ती मोर्चाने चिखली तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. भूमी मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात शेकडो महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अंमलबजावणीतील कमतरते आणि शेतकऱ्यांच्या दुष्काळ व अतिवृष्टी नुकसानीच्या भरपाईसाठी अनुदाना बाबत तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
मोर्च्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणांद्वारे आपल्या मागण्या मांडल्या. यापैकी मुख्य मागण्या शेतकरी, कष्टकरी, कामगार व भूमिहीनांची १००% कर्जमाफी, सध्या शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत असल्याने पूर्ण कर्जमाफीची मागणी या होत्या. तसेच वनमहसूल विभागाची जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बेघर कुटुंबांना कायमस्वरूपी मालकी हक्काची मागणी, शेतकऱ्यांना गुंठेवारी पांदण रस्ते व शेतरस्त्यांची अंमलबजावणी, शासन निर्णयानुसार गुंठेवारी पांदण रस्ते आणि शेतरस्त्यांचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व आर्थिक मदत, गेल्या हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, पीक विम्याचे पैसे आणि आर्थिक मदत देण्यात यावी या मागण्या सुध्दा या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.

रमाई घरकुल योजनेचा अनुदान रक्कम २.५ लाख रुपयांपर्यंत वाढवावे, खामगाव जिल्ह्यात उदयनगरला स्वतंत्र तालुका म्हणून घोषित करावे ज्यामुळे स्थानिक प्रशासनिक सोयी सुधारतील. अल्पसंख्यांक समाजासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून सुशोभिकरण करण्याची करण्यात यावे, अमडापूर पोलिस स्टेशन हद्दीतील वरली, दारू, मटका, जुगारसह सर्व अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी सुध्दा या वेळी करण्यात आली. पारधी समाजाला जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड व आधारकार्डसाठी प्रशासकीय अहवाल तयार करून देण्याच्या मागणीवर विशेष भर देण्यात आला.
भाई प्रदीप अंभोरे यांनी तहसीलदार साहेबांना सादर केलेल्या निवेदनात या सर्व मागण्यांचा तपशील नमूद केला असून, शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी विनंती केली आहे. शेतकरी आणि भूमिहीनांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. शासनाच्या योजना कागदावरच राहिल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलने आणखी तीव्र होणार असल्याचे मत यावेळी भाई प्रदीप अंभोरे यांनी व्यक्त केले.
मोर्च्यात भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात भीमराव पाटील, भगवान गवई, सुभाष घुगे यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी मधुकर मिसाळ, दीपक कस्तुरे, अनिस खान, गजानन जाधव, ज्ञानदेव मिसाळ, बी. एस. जाधव, सुधाकर लव्हाळे यांसह इतर पदाधिकारी व शेकडो महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.
हा मोर्चा चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील असंतोषाचे प्रतिबिंब असुन स्थानिक शेतकरी व कामगारांमध्ये या आंदोलनाची पाठराखण होत राहील. शासनाकडून लवकर प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा केली असुन पुढील काळात भूमी मुक्ती मोर्चाच्या माध्यमातुन या मागण्यांसाठी आणखी मोठी आंदोलने उभी करण्याचा इशारा सुध्दा दिला.




