अजित पवारांची उद्या चिखलीत सभा; निलेश गावंडे यांच्या प्रचाराला उपमुख्यमंत्र्यांची ताकद

क़ासीद / चिखली : चिखली नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात आता थेट राज्य पातळीवरील दिग्गज मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उद्या, बुधवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी चिखलीत दाखल होत आहेत. दुपारी ३ वाजता शहरातील राजा टॉवर येथे होणारी ही “परिवर्तन सभा” युतीसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या घड्याळाला शिवसेनेच्या धनुष्यबाणाची ताकद मिळाल्याने चिखलीत युतीने आक्रमक मोड घेतला आहे. भाजप-काँग्रेस आघाडीला शह देण्यासाठी युतीने सर्वोच्च संघटनात्मक तयारी केली असून, अजित पवारांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि सामाजिक भान जपणारे नेतृत्व म्हणून डॉ. निलेश गावंडे यांची शहरात वेगळी ओळख आहे. सातत्यपूर्ण समाजकार्य, दमदार जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबाबत अपार विश्वास निर्माण झाला आहे. गावंडे यांच्या युतीत प्रवेशानंतर प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये मोठी खळबळ माजली असून, उद्याची अजितदादांची सभा त्यांना आणखी घाम फोडणारी ठरेल, असे बोलले जात आहे.

आपल्या बिनधास्त, थेट आणि विकासाच्या भाषणशैलीसाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार उद्या चिखलीकरांना “शहराच्या विकासाची धुरा निलेश गावंडे यांच्याकडे द्या” असा स्पष्ट संदेश देणार आहेत. ही सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल, असा विश्वास युतीचे नेते-कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. राजा टॉवर मैदानावर होणारी ही सभा चिखलीच्या राजकारणातील उद्याचे टर्निंग पॉइंट ठरेल, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *