आपला जिल्हा

बुलढाणा जिल्ह्यातील येवता गावात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला; डिगांबर घेवंदे जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

क़ासिद / बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील मौजे येवता येथे बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. स्वतःच्या शेतात काम करीत असताना डिगांबर घेवंदे (रा. येवता) यांच्यावर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात घेवंदे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ बुलढाण्यातील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. याआधीही आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या असूनही, वनविभागाकडून ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

“हा केवळ नशीबाचा भाग म्हणावा लागेल, पण पुढील वेळी असा हल्ला जीवघेणा ठरू शकतो. याची जबाबदारी कोण घेणार? वनविभाग आणि प्रशासन नेमके काय करत आहे?” असा संतप्त प्रश्न स्थानिक शेतकरी उपस्थित करीत आहेत. शेतकरी रोज जीव मुठीत धरून शेतीकाम करणार का? असा सवाल करीत नागरिकांनी वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *