आरोग्य

चिखली प्रभाग क्रमांक १२ मधील मुस्लिम कब्रस्तान मधील विकास कामांना गती देण्यासाठी नागरिकांचे निवेदन.

सदर निवेदन मोहम्मद सोहेल मोहम्मद आसीफ यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

क़ासिद / चिखली : प्रभाग क्रमांक १२ मधील मुस्लिम कब्रस्तान परिसरातील विविध मूलभूत सुविधा आणि विकास कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे आज दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे कब्रस्तान परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला आहे.

सदर निवेदन हे मोहम्मद सोहेल मोहम्मद आसीफ यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून यावेळी श्रीकांत राऊत, प्रशांत भटकर, अप्पू खान, मोहम्मद सादिक, मिलिंद हिवाळे, असलम शेख, शेख तौसीफ, मनोज म्हस्के, शेख अफजल, अली खान, मोहम्मद वसीम, मलिक शेख, जीवन सोनवणे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सध्या रात्रीच्या वेळी अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. कब्रस्तान परिसरात पुरेशा संख्येने दिवे बसवून नियमित देखभाल करण्याची मागणी या निवेदनात केली आहे. तसेच कब्रस्तान समोरील रस्त्यावरील खांबावर असलेले लाईट बंद पडलेले असून सदर लाईट्स तात्काळ सुरू करून रस्त्यावरील सुरक्षितता वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सुद्धा निवेदनात व्यक्त केले आहे. परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने आरोग्याला धोका निर्माण होत असून, स्वच्छता करण्यात यावी.

या सर्व समस्या या परिसरातील नागरिकांना रोजच्या आयुष्यात त्रासदायक ठरत आहेत. कब्रस्तान हे धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील स्थळ असल्याने त्याची स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि मूलभूत सुविधा याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन कर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे तात्काळ या प्रलंबित कामांना गती देण्याची विनंती केली असून, लवकरात लवकर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. स्थानिक समुदायातील या एकजुटीच्या प्रयत्नामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, येत्या काही दिवसांत या मागण्यांची पूर्तता होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *