चिखली नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी वैशाली खेडेकर
स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवक सागर पुरोहित, सुरेंद्र ठाकूर आणि प्राचार्य निलेश गावंडे यांची निवड

क़ासीद / चिखली (बुलढाणा) : चिखली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज, मंगळवारी (१३ जानेवारी) पहिली सर्वसाधारण सभा घेऊन उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या या सभेचे अध्यक्ष म्हणुन नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) बहुमताने विजय मिळवला होता. नगराध्यक्षपदी पंडितराव देशमुख यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. आजच्या सभेत सत्तासमीकरण आणि राजकीय ताकदीचे चित्र स्पष्ट झाले.
उपनगराध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेना महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) च्या नगरसेविका सौ. वैशाली कपिल खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर विरोधकांकडून काँग्रेसच्या श्रीमती सुनिता प्रकाश शिंगणे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती. यामध्ये वैशाली खेडेकर यांना १६ मते मिळाली तर सुनिता शिंगणे यांना १३ मते मिळाली. यामुळे सौ. वैशाली कपिल खेडेकर या चिखली नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवडून आल्या. या निवडीमुळे महायुतीच्या सत्तेची पुष्टी झाली असून, सौ. खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सभेत स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया सुध्दा पार पडली. भारतीय जनता पक्षाकडून (सत्ताधारी गट) शहराध्यक्ष सागर पुरोहित, सुरेंद्र ठाकूर आणि विरोधकांकडून:प्राचार्य निलेश गावंडे या स्वीकृत नगरसेवकांच्या समावेशामुळे नगरपरिषदेच्या कामकाजाला अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूप मिळेल.
नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वात उपनगराध्यक्ष वैशाली खेडेकर, स्वीकृत नगरसेवक आणि इतर सदस्य मिळून चिखली शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते विकास, स्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देतिल व पुढील पाच वर्षांत शहरात सकारात्मक बदल घडवतील अशी अपेक्षा चिखलीकर नागरिकांनी व्यक्त केली.



