
क़ासीद / चिखली (फयाज़ खान) : नगर परिषद पीएमश्री रहीम अली खान नगरपरिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १ या शाळेत दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास चिखली शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण सभापती शेख रफिक सेठ यांनी भूषविले.
शाळेतील विद्यार्थिनींनी आई-वडिलांचा आदर व सन्मान या विषयावर आधारित प्रबोधनात्मक गीतावर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित मान्यवर व पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच इतर मनोरंजक गीतांवर नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. शैक्षणिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून दिसून आलेली गुणवत्ता आणि नगरपरिषदेच्या आश्वासनांमुळे हे स्नेहसंमेलन सर्वार्थाने यशस्वी व प्रेरणादायी ठरले. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना व्यासपीठ मिळाल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनी नगरपालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले. शाळेच्या सुशोभिकरण, दुरुस्ती व संगणकीय कक्षासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी जलद गतीने प्रयत्न करण्यात येतील, तसेच शैक्षणिक समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे मुख्य साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना गुणवत्ता, शिस्त व संस्कारांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
या स्नेहसंमेलनास नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, महिला व बालकल्याण सभापती सुषमा विलास चव्हाण, विरोधी पक्षनेते म. इसरार अ. जब्बार, तसेच नगरसेवक उबेदअली खान शब्बीरअली खान, डॉक्टर प्रकाश शिंगणे, सुरेंद्र सिंह ठाकुर, नगरसेविका सौ. संध्या आनंद बोंद्रे, अश्विनी विश्वनाथ जाधव, सौ. प्रिया राम बनसोडे यांचा समावेश होता. तसेच पत्रकार व शाळा समिती सदस्य फयाज खान, शाळा समिती अध्यक्ष सलीम परवेज, मोहम्मद शारीक, जावेद बागवान, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी संचलन मुख्याध्यापक अबिद सर यांनी केले. संचलनादरम्यान त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक व भौतिक समस्यांकडे माननीय नगराध्यक्षांचे लक्ष वेधले. शाळेच्या इमारतीचे सुशोभिकरण, आवश्यक दुरुस्ती, तसेच विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी नवीन संगणकीय खोली उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
हे स्नेहसंमेलन विद्यार्थी-पालक-शिक्षक-प्रशासन यांच्यातील स्नेह वाढवणारे आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरले. चिखली नगर परिषदेच्या शाळांमध्ये अशा कार्यक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण होत असल्याचे दिसून येते.



