Blog
चिखली–मेहकर सिमेंट मार्ग ठरतोय “मृत्यूचा सापळा” रस्त्यावरील भेगेत अडकून दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जख्मी
वेगाने वाहन चालावे म्हणुन बनवलेल्या रस्त्यावर प्रचंड भेगा

क़ासीद / चिखली : चिखली ते मेहकर रस्त्यावर नागझरी फाटा परिसरात सिमेंट रस्त्याला पडलेल्या भेगेमुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. संजय गणपत तायडे (वय ३६, रा. पेठ, ता. चिखली) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. आज दुपारी सुमारे ४:३० वाजेच्या सुमारास संजय तायडे हे पेठ येथून मेहकरकडे दुचाकीने जात होते. नागझरी फाटा (ता. मेहकर) येथे चिखली–मेहकर रोडवरील सिमेंट रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भेगेत दुचाकीचे टायर अडकल्याने दुचाकीचा अचानक तोल गेला व संजय तायडे हे रस्त्यावर जोरात आदळल्यामुळे गंभीर जख्मी झाले.
या बाबत सविस्तर असे की, संजय गणपत तायडे हे आपल्या दुचाकीने आज दुपारी सुमारे ४:३० वाजेच्या सुमारास पेठ येथून मेहकरकडे दुचाकीने जात होते. नागझरी फाट्याजवळ रस्त्याला पडलेल्या भेगेत त्यांच्या दुचाकीचे टायर अडकल्याने त्यांचा तोल गेला व ते रस्त्यावर डोक्यावर आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून सध्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.
दरम्यान, चिखली–मेहकर मार्गावरील सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याच रस्त्यामुळे यापूर्वीही किरकोळ अपघात झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, तसेच धोकादायक ठिकाणी इशारा फलक व तात्पुरती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. या अपघाताचा संबंधीत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुध्दा नागरीकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगितले.



