शेतात काम करताना दिसला बिबट्या ! रायपूर परिसरात भीतीचे सावट, ग्रामस्थांची तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी.
फयाज शेख यांच्या माध्यमातून उघडकीस आली बिबट्याची भीती.

क़ासीद / रायपूर (फयाज़ शेख) : बुलढाणा तालुक्यातील रायपूर गाव आणि आसपासच्या शेतपरिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज ९ फेब्रुवारी रोजी शेतात काम करताना बिबट्या दिसल्याच्या घटनेने परिसरातील दहशत आणखी वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून रायपूर परिसरात बिबट्याच्या दर्शनाच्या घटना वाढल्या आहेत. हंगामी काळात (हिवाळ्यात) जंगलातील पाणी आणि अन्न कमी झाल्याने बिबट्या गावाजवळच्या शेतात येऊन पाळीव जनावरांची शिकार करत असल्याचे ग्रामस्थ म्हणने आहे. गेल्या काही दिवसांत अनेक पाळीव प्राण्यांची शिकार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. दिवसा देखील शेतात जाण्यास भीती वाटते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
रायपूर गावातील शेतकरी शेख आबू भाई यांनी समाजसेवक आणि ‘साप्ताहिक विदर्भ का क़ासीद’चे प्रतिनिधी मोहम्मद फयाज मोहम्मद एजाज शेख यांना बिबट्याच्या दर्शनाची माहिती दिली. त्यानंतर मो. फयाज शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्या लपलेल्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यांनी स्थानिक वनरक्षक आणि वनपाल यांना त्वरित दूरध्वनीवरून माहिती दिली. मात्र, वन विभागाकडून तात्काळ आणि योग्य प्रतिसाद मिळाला नाही. उशीरा पोहोचलेल्या वनपालांनी “कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते” असे सांगीतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि रोष निर्माण झाला आहे.
शेतकरी आणि ग्रामस्थ म्हणतात, “वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला शेतीकाम करताना सतत धोका वाटतो. भविष्यात एखादी अनुचित घटना घडली तर त्याची पूर्ण जबाबदारी वन विभागावर राहील. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी दिवसाढवळ्या शेतात जाण्यास घाबरत आहेत. यामुळे हंगामातील शेती कामे ठप्प होण्याची भीती आहे.”
ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यात पिंजरे (cage trap) लावणे, परिसरात गस्त वाढवणे, शेतकरी आणि नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणे आणि बिबट्याला सुरक्षितपणे जंगलात हलवणे यासारख्या पावलांचा समावेश आहे. परिसरात भीतीचे सावट कायम असून, वन विभागाने त्वरित ठोस कारवाई करून शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.



