Farhan Computer
विशेष

चिखलीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी; जयघोषाने दणाणले शहर

चिखलीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी; जयघोषाने दणाणले शहर

क़ासीद / चिखली : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्‍मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त जगभरात साजरा होणारा ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र उत्सव चिखली शहरातही मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने चिखली शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. मिरवणुकीतील जयघोष, धार्मिक घोषणांनी शहराचा परिसर दणाणून गेला होता.

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने सकाळपासूनच शहरातील मुस्लिमबहुल भागांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. विशेषतः नूर चौक परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

ईद-ए-मिलादच्या मुख्य मिरवणुकीला स्थानिक बाबुलॉज चौकातून सुरुवात झाली. मिरवणूक राजा टॉवरसमोरून चिंच परिसर, सावजी गल्लीमार्गे जुनेगाव परिसरात पोहोचली. त्यानंतर पुन्हा चिंच परिसरातून बागबान गल्ली, नूर चौक, नगर परिषदेसमोरून पंचायत समिती मार्गाने हजरत खैरुल्लाह शाह बाबा दर्गाह परिसरात मिरवणुकीची फातेहा ख्वानीने सांगता करण्यात आली.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभाग

या मिरवणुकीत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. धार्मिक घोषणांसह शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देत मिरवणूक मार्गक्रमण करीत होती. मिरवणुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांकडून प्रसाद, शरबत व खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले.

हजरत मुहम्‍मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मानवतेला शांती, प्रेम, बंधुभाव आणि सदाचाराचा संदेश दिला. त्यांच्या जीवनातून संपूर्ण मानवजातीला शांतता व माणुसकीचा मार्ग मिळतो, अशी भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

शहरात आकर्षक सजावट

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर चिखली शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट व रोषणाई करण्यात आली होती. अनेक ठिकाणी आकर्षक कमानी, विद्युत रोषणाई आणि धार्मिक संदेशांचे फलक लावण्यात आले होते. यामुळे शहरातील वातावरण उत्सवी झाले होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलिसांकडून शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासह मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

ईद-ए-मिलादचे औचित्य साधून चिखली शहरात विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिराला विशेष महत्त्व देण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेत रक्तदान केले. धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आल्याने त्याचे कौतुक करण्यात आले.

ईद-ए-मिलादचा उत्सव उत्साह, श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि बंधुभावाच्या वातावरणात पार पडल्याने चिखली शहरात दिवसभर उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.